पदरी पडल पवित्र झाल !
एखादी गोष्ट बघितल्याबरोबर भुरळ पडते. मग ती गोष्ट आपलीशी करणंच कसं शहाणपणाचं आहे, हे इतरांना पटवलं जातं. खरं म्हणजे स्वतःलाच पटवलं जातं, की आपलाच निर्णय योग्य आहे म्हणून. मग आटापिटा करून ती गोष्ट मिळवली जाते. मग जवळीक अन् कौतुक ओसरून जमिनीवर आलं, की वास्तवाचं भान येतं. मग आवडत्या गोष्टीचं मूल्य मनातल्या मनात थोडं कमी पडतं. पण अगदी कळत- नकळत. मग ते थोडे थोडे वेगळे जाणवू लागले, की परिस्थितीपासून थोडं अंतर मिळालं असं समजायला हरकत नाही. कधी कधी हे अंतर वाढत जातं. दोष जास्त मोठे दिसू लागतात. कल्पनेतल्या किंवा भारावलेल्या अवस्थेतल्या गोष्टीपेक्षा खरी गोष्ट वेगळीच आहे, हे जाणवायला सुरवात होते. मनाच्या आत जाणवलेल्या तक्रारी बाहेर व्यक्त व्हायलाही खूप वेळ लागू शकतो. कधी सौजन्य आड येतं, तर कधी पारदर्शकतेचा अभाव. पण कधी ना कधी आतल्या तक्रारी अन् बाहेरचं सगळं आलबेल असल्याचं भासवणं, ही तारेवरची कसरत उघड होतेच. मग त्या गोष्टीतही बदल होतच जातात. मग व्यावहारिक फायदे-तोटे, भावनिक गरजा आणि मूल्य, स्वतःची वाढत जाणारी ओळख, आंतरिक संवाद आणि या सगळ्या गोष्टींची बदलणारी समीकरणं अन् बेरीज-वजाबाक्या यातून दृश्य स्वरूपातले बदल फक्त बाहेरच्यांना दिसतात. मग निषेध आणि दुरावा, भांडणे अन् फारकत या गोष्टी दूर नसतात. लहानपणीच पुरेशी खेळणी मोडून टाकून दुसरे तिसरे प्रयोग करण्याइतकं स्वातंत्र्य मिळालं, तर मोठेपणीच्या गोष्टींची अशी मोडतोड, उधळमाधळ थांबवता येईल का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. पण एखाद्या गोष्टीला स्वीकारणं हे मूल्य इतकं अवघड आहे का? ही स्वतःच्या निर्णयक्षमतेची कसोटीच नव्हे का? तक्रारी असल्या तरी सहनशक्ती ठेवणं, वाढवणं, जबाबदारीचं भान असणं महत्त्वाचे गुण आहेतच की! विधायक किंवा रचनात्मक कृती करणं, प्रयत्न करणं, निभावण्याची क्षमता वाढवणं- या गुणांची स्वतःच जोपासना होत जाते. स्वतःला आणि दुसऱ्यांना क्षमा करता येणं, या सगळ्या प्रवासात स्वतःच्या आणि इतरांच्या गरजांची जास्त चांगली ओळख होणं, सौजन्यानं आणि मृदूपणानं या प्रक्रियांमधून हळुवार प्रवास करणं, गरजा भागवण्यासाठी आपला आपण निर्णय घेऊन कष्ट करत राहणं, यातून आयुष्याला अर्थ येतो किंवा खरं म्हणजे असलेला अर्थ आपल्याला उलगडत जातो, असं म्हटलं तर बरोबर ठरेल. हा पदरी पडलेलं पवित्र होण्यातला अनुभव आयुष्याच्या इतर क्षेत्रांतही उपयुक्त ठरतो, हे वेगळं सांगायला नकोच !